पिंपरी: कोणतीही परवानगी आणि सुरक्षेची खबरदारी न घेता बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे कारवाया करण्यात आल्या. याप्रकरणी बुधवारी (दि. २६) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चिखली येथील कारवाईमध्ये २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत अभिषेक वीरभद्र स्वामी (वय २४, रा. चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार किरण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक स्वामी याने घरगुती वापराच्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस रिफील केला. गॅस रिफील करताना त्याने सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नाही. तसेच रिफील केलेल्या सिलिंडरची चढ्या दराने विक्री केली. पोलिसांनी गॅस साठा आणि इतर साहित्य असा एकूण २७ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने बुधवारी (दि. २६) सायंकाळी चक्रपाणी वसाहत भोसरी येथे केली. ओम साई गॅस सर्व्हिस या दुकानात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग केले जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली. यश प्रेमदास सरदार (वय २०, रा. भोसरी) हा धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करत असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.


