पुणे: पुण्याला विद्येचे माहेरघर मानले जाते मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये गुन्हेगारी आणि दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याता आता पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पाठबळ मिळाल आहे. चार जणांनी घरात घुसून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
घडलेल्या घटनेनंतर रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यात त्यांनी म्हचले की, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिद यांच्यावर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली.
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.


