Beed Crime News: मैत्रीत आलेल्या एका छोट्याशा दुराव्याने इतका मोठा अनर्थ घडेल, याची पुसटशी कल्पनाही कुंबेफळ ग्रामस्थांना नव्हती. आपल्या जीवलग मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आपल्याला बोलावले नाही, या कारणातून आलेल्या टोकाच्या नैराश्यातून २४ वर्षीय महेश उद्धव भणगे या तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.
नेमकी घटना काय?
महेशचा एक जवळचा मित्र असून ६ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांनी महेशला निमंत्रण दिले नाही आणि त्याला वगळूनच सेलिब्रेशन केले. ही बाब महेशच्या मनाला प्रचंड लागली. गेल्या काही दिवसांपासून तो याच कारणाने मानसिक तणावात होता. मंगळवारी दुपारी त्याने घराच्या छतावर जाऊन पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून ते प्राशन केले.
अखेरचे स्टेटस आणि एकाकीपणाची भावना
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर एक भावूक स्टेटस ठेवले होते. “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो,” असे शब्द त्याने स्टेटसवर लिहिले होते. यावरून त्याच्या मनातील एकाकीपणाची आणि नैराश्याची भीषणता स्पष्ट होत आहे.
कुटुंबीयांना बसला मोठा धक्का
दुपारी छतावर झोपायला गेलेला महेश रात्री ८ वाजेपर्यंत खाली आला नाही, म्हणून कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी वर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


