मुंबई: सोमवारी शेअर बाजाराने मोठ्या वाढीसह व्यवहार सुरू केला. सेन्सेक्स गेल्या बंदपेक्षा १३४९ अंकांनी वाढीसह उघडला, तर निफ्टी ४१२ अंकांनी वाढीसह उघडला. परंतु, ९:३० मिनिटांनी, सेन्सेक्स १९०० अंकांपेक्षा जास्त किंवा २.४०% वाढून ८१,३९१.९५ च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी ५९७.२१ अंकांनी किंवा २.४९% वाढून २४,६०५.२० ची पातळी ओलांडला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारानंतर शेअर बाजारात ही तेजी आली आहे. बाजारातील वाढीमुळे सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांचे बाजार भांडवल ११ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक वधारला, तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याशिवाय ट्रेंटचे शेअर्स ५ टक्के, अॅक्सिस बँक ४ टक्के आणि श्रीराम फायनान्स ४ टक्क्यांनी वाढले आहेत. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. त्याचवेळी, औषध क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टी ५० च्या शेअर्समध्ये, सन फार्मा सर्वाधिक तोट्यात होता, ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर सिप्लाचे शेअर्सही जवळपास १ टक्क्यांनी घसरले.
बाजार इतकी तेजी का?
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोमवारी शेअर बाजारात एवढी तेजी येण्यामागे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम हे कारण असल्याचे मानले जात आहे. तथापि, अमेरिका आणि चीनमधील व्यापार करार, भारत-यूके व्यापार करार आणि एफआयआयकडून सतत होणारी खरेदी ही देखील महत्त्वाची कारणे आहेत.


