Badshah : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकीकडे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे आता लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पानीपतमध्ये झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी घेताना बिश्नोई गँगने बादशाहसाठी एक नोट जारी केली आहे.
बिश्नोई गँगने नोटमध्ये लिहिलं आहे की, ‘जय महाकाल, जय श्रीराम. सर्व भावांना राम-राम. आज असंध रोड, पानीपत येथे वेस्टर्न युनियनशी (हवाला व्यवसाय) संबंधित गॅरी आणि शँकी यांच्या ऑफिसवर जो गोळीबार झाला आहे, त्याची जबाबदारी मी रणदीप मलिक आणि अनिल पंडित (USA) घेतो. हे लोक हवालाद्वारे देशाचा पैसा परदेशात पाठवून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करत होते. आम्ही त्यांना आधी फोन करून इशारा दिला होता, पण त्यांना समजलं नाही. आजची घटना फक्त एक ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. जे लोक हवालाचे काम करतात, त्यांनी वेळेत सुधारावं, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील.’
गायक बादशाहला धमकी देताना गँगने पुढे लिहिलं की, ‘सिंगर बादशाह, तू हरियाणाची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. २०२४ मध्ये तुझ्या क्लबमध्ये तुला ट्रेलर दाखवला होता, पुढच्या वेळी थेट तुझ्या डोक्यात गोळी मारू.’ याशिवाय पोस्टमध्ये ‘लॉरेन्स बिश्नोई ग्रुप’ला सलाम म्हणत गँगस्टर्सची नावंही लिहिण्यात आली आहेत.
बादशाह सध्या त्याच्या ‘टटीरी’ या हरियाणवी गाण्यामुळे वादात सापडला आहे. हरियाणा महिला आयोगाने याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने पोलिसांना आदेश दिला आहे की, जर बादशाह तपासात सहकार्य करत नसेल तर त्याला त्वरित अटक करण्यात यावी. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी गरज पडल्यास बादशाहचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून तो देश सोडून जाऊ शकणार नाही.
‘टटीरी’ गाण्यावरून देशभरात झालेल्या विरोधानंतर बादशाहने यापूर्वीच माफी मागितली आहे. त्याने माफी मागतानाचा एक व्हिडीओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने स्वतःला ‘प्राउड हरियाणवी’ म्हटलं होतं. “हरियाणातील कोणत्याही मुलाबद्दल किंवा महिलेबद्दल चुकीचे बोलण्याचा माझा कधीही हेतू नव्हता,” असं त्याने स्पष्ट केलं होतं.


