मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोने अनेक कलाकारांना स्वत:ची नवी ओळख मिळवून दिली आहे. या शोमधील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांचे आवडते आहे. शो सोडल्यानंतरही ते स्मरणात राहतात. जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हे असेच एक पात्र आहे. तिने या शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. आज ती या शोचा भाग नाही. मात्र, चाहत्यांना तिची पडद्यावर खूप आठवण येत आहे.
निर्माता असित मोदीसोबत झालेल्या वादानंतर जेनिफरने हा शो सोडला होता. आता एका मुलाखतीत जेनिफरने खुलासा केला आहे की, तिने अनेक मोठे प्रोजेक्ट्स कसे नाकारले होते. ‘तारक मेहता’ सोडल्यानंतर तिचे शोमध्ये परत येणे हे नशिबानेच ठरवले होते. मी गरोदरपणानंतर २०१३ मध्ये ‘तारक मेहता’ सोडला. मी २०१५ मध्ये ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट केला. १८ दिवसांपैकी मी फक्त दोन दिवस चित्रीकरण केले. एडिटिंगमध्ये माझे बरेच सीन कापले गेले असले तरी, काही महिन्यांनंतर मी ‘नागिन १’ साठी करार केला. मी एकता कपूर आणि तिच्या टीमला भेटले. त्यावेळी माझी मुलगी दोन वर्षांची होती.
माझे सासू-सासरेही माझ्यासोबत सेटवर आले होते. आम्ही १० दिवस चित्रीकरण केले. मी पाच मुख्य खलनायकांपैकी एक होते. माझी भूमिका रंजक होती. १० दिवसांनंतर, मी प्रोडक्शन मॅनेजरला सांगितले की, मला ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाचे चित्रीकरण करायचे आहे, त्यामुळे मी २१ दिवस थांबणार नाही. ‘नागिन’च्या निर्मात्यांनी सांगितले की, मी शुटिंगसाठी जाऊ शकत नाही.
अखेरीस, माझी संपूर्ण भूमिकाच काढून टाकण्यात आली. माझा विनोदी भाग तसाच ठेवण्यात आला. या संपूर्ण दृश्यानंतर काही दिवसांनी असितजींनी मला फोन करून मालिकेत परत येण्यास सांगितले होते.


