State Cultural Awards: राज्यातील कला, संस्कृती आणि परंपरेला मोठा हातभार लावणाऱ्या ज्येष्ठ व युवा कलावंतांचा सन्मान करणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक, संगीत, वाद्यनिर्मिती, लोककला, तमाशा, लावणी, शाहिरी, आदिवासी कला, चित्रपट, प्रयोगात्मक कला यांसह एकूण 40 हून अधिक कलावंतांचा या वर्षी गौरव होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुरस्कारप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
पुरस्कारांचे स्वरूप
ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे.
ज्येष्ठ पुरस्कारांचे मानकरी –
नाटक क्षेत्रातील अरुण कदम, कंठसंगीतातील धनंजय जोशी, वाद्यसंगीतातील विजय चव्हाण, मराठी चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, उपशास्त्रीय संगीताचे उदय भवाळकर, कीर्तनकार गहिनीनाथ औसेकर, तमाशा क्षेत्रातील कोंडीराम आवळे, शाहिरीतील मधुकर मोरे आणि अनेक क्षेत्रातील अग्रगण्य कलाकार यांचा समावेश आहे.
युवा पुरस्कारांमध्ये या कलाकरांचा होणार गौरव
नाटक अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता भूषण कडू, उपशास्त्रीय संगीताचे राहुल देशपांडे, चित्रपट अभिनेत्री मधुरा वेलणकर, नृत्यांगना वृषाली दाबके, लावणी कलाकार प्रमिला लोदगेकर, शाहिर आझाद नाईकवडी, तसेच अनेक लोककलावंत, आदिवासी कलाकार व नवोदित कला साधकांचा गौरव करण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि मंत्री आशिष शेलार यांनी विशेष अभिनंदन केले.


