आपलं आरोग्य चांगलं तर शरीर चांगले. आरोग्य आणि शरीर हे एकमेकांशी निगडित असतात. त्यात वेदना हा शब्द जरी ऐकला नको नकोसे होते. पण वेदना हा आपल्या शरीराकडून मिळणारा एक महत्त्वाचा संकेत आहे, जो आपल्याला दुखापत किंवा अंतर्गत समस्येबद्दल सावध करतो. मात्र, जेव्हा ही वेदना तीव्र किंवा दीर्घकाळ टिकणारी होते, तेव्हा लोक ती कमी करण्यासाठी अनेकदा वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलरचा आधार घेतात.
वेदना थेट दुखापतीतूनच उद्भवत नाहीत. उलट, शरीरातील विशेष मज्जापेशी दुखापत किंवा सूज ओळखतात आणि मेंदूला संकेत पाठवतात. मेंदू या संकेतांचा अर्थ वेदना म्हणून लावतो. यामुळेच वेदनाशामक औषधे वेदनेच्या मूळ कारणावर हल्ला न करता, हे संकेत रोखण्याचे काम करतात. जेव्हा तुम्ही वेदनाशामक औषध घेता, तेव्हा ते पोटात विरघळते आणि रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरात पसरते. त्याचा परिणाम साधारणपणे काही मिनिटांत सुरू होतो, तर काही औषधांना एक तास लागू शकतो. ही औषधे शरीरात तयार होणारी अशी रसायने कमी करतात, जी दाह आणि वेदनांसाठी जबाबदार असतात.
काही वेदनाशामक औषधे थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणारे वेदनांचे संकेत मंदावतात, तर काही औषधे शरीरातील नैसर्गिक एंडोर्फिन प्रणालीला सक्रिय करतात, ज्यामुळे वेदनेची जाणीव कमी होते. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांसाठी वेगवेगळी औषधे दिली जातात. मात्र, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक वेदनाशामक औषधाचा सर्व प्रकारच्या वेदनांवर सारखाच परिणाम होत नाही. वेदनेचे अनेक मार्ग आणि कारणे असतात, त्यामुळे औषधांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.


