Pimpri Chinchwad Crime: हाताची कमालीची सफाई आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात दुचाकीचे लॉक तोडून पसार होणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ५.५० लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तपासाची चक्रे आणि अटक
चाकण एमआयडीसी परिसरात कामगारांच्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस सतर्क झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी निलेश राजू मंडलिक (रा. अहिल्यानगर) हा आंबेठाण चौकात असल्याची टीप पोलीस कर्मचारी शुभम खंडागळे यांना मिळाली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चोरीची धक्कादायक पद्धत
पोलिसी चौकशीत निलेशने दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. निलेश इतका सराईत आहे की, तो फक्त ३० सेकंदात कोणत्याही दुचाकीचे लॉक तोडून गाडी लंपास करायचा. औद्योगिक वसाहतीत कामगार कामावर गेल्यानंतर पार्किंगमधील गाड्या तो टार्गेट करायचा. चोरी केलेल्या या गाड्यांचा त्याचा साथीदार संदीप सोनवणे हा कमी किमतीत सौदा करायचा आणि त्यातून मिळणारे पैसे दोघे वाटून घेत असत.
पोलिसांचे जनजागृतीपर पाऊल
नागरिकांनी आपल्या वाहनांची काळजी कशी घ्यावी, हे सांगण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या चोरीच्या पद्धतीचे एक प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील तयार केला आहे. यातून ही टोळी किती वेगाने चोरी करायची हे समोर आले आहे. आम्ही १३ दुचाकी जप्त केल्या असून आरोपी सध्या कोठडीत आहेत. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी किंवा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असलेल्या पार्किंगमध्येच लावावीत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले आहे.


