Bacchu Kadu Farmer Protest: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांपर्यंतच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. कर्जमुक्ती, हमीभाव आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांवरून बच्चू कडू आक्रमक भूमिकेत उतरले असून, नागपूरमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू आहे. गेल्या 15 तासांपासून नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबादसह चार प्रमुख महामार्ग ठप्प झाले आहेत. हजारो वाहनं अडकली असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाला धडकी भरली आहे.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता पाहता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की, सत्तेत येताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा देणाऱ्या सरकारने अद्याप दिलासा दिला नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकारने दिलेल्या मदतीची घोषणा अद्याप फसवी ठरली आहे. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाई वितरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा –Tractor Morcha : नागपूरात ट्रॅक्टर, बैलगाड्यासह हजारो शेतकरी धडकणार; कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या –
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी — कोणत्याही अटीशर्तींशिवाय सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे.
- एफ.आर.पी. वाढवावी — ऊस उत्पादकांना प्रति टन 4300 रुपये (9% रिकव्हरीसाठी) आणि थकबाकी तत्काळ द्यावी.
- कांद्याला योग्य दर द्या — प्रति किलो 40 रुपये किमान भाव, तसेच निर्यातबंदी व कर कायमस्वरूपी रद्द करा.
- दुधाला उत्पादनखर्चावर आधारित दर — गायीच्या दुधाला ₹50 आणि म्हशीच्या दुधाला ₹65 दर द्यावा.
- कृषी मालाला हमीभावावर 20% अनुदान देण्यात यावे.
- दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथांना मासिक 6000 मानधन द्यावे.
- मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनविषयक प्रश्न कायमस्वरूपी सोडवावेत.
बच्चू कडूंच्या या आंदोलनाने नागपूरमध्ये वाहतूक ठप्प झाली असली, तरी त्यांच्या मागण्यांबाबत शेतकरी वर्गात मोठी एकजूट दिसून आली आहे. आता सरकार या आंदोलनाला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


