Andhra Pradesh Encounter: नक्षलवादी नेता माडवी हिडमा याच्या खात्म्यानंतर दुसऱ्याच दिवशी आंध्र प्रदेशात माओवादी संघटनेला मोठा फटका बसला आहे. मारेदुमिल्ली (अल्लुरी सीतारामराजू जिल्हा) परिसरात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्तचर विभागाचे एडीजी महेश चंद्र लड्ढा यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला माओवादींचा समावेश आहे. एका मृत माओवादीची ओळख मेतुरी जोखा राव उर्फ शंकर अशी झाली असून, तो श्रीकाकुलमचा रहिवासी आणि AOB (आंध्र–ओडिशा बॉर्डर) कमिटीचा प्रभारी (ACM) होता. शंकर हा शस्त्रास्त्र निर्मिती, तांत्रिक साधने आणि संप्रेषणाचा तज्ज्ञ असल्याची माहिती मिळत आहे.
हिडमाचा खात्मा
मंगळवारी छत्तीसगड–आंध्र सीमेवर झालेल्या चकमकीत कुप्रसिद्ध नक्षलवादी माडवी हिडमा (51), त्याची पत्नी मडकम राजे, आणि इतर चार नक्षलवादी ठार झाले होते. हिडमा हा गेल्या दोन दशकांतील अनेक भीषण हल्ल्यांचा सूत्रधार मानला जात होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी म्हटले की, ही कारवाई डाव्या अतिरेकीवादाविरुद्धच्या लढाईतील निर्णायक यश आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टीलिंगम यांनीही याला ऐतिहासिक दिवस म्हटले. हिडमाचा मृत्यू हा नक्षलविरोधी कारवाईच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण यशांपैकी एक आहे, असे ते म्हणाले.
दंडकारण्यातील दहशतीचा अंत
हिडमा हा झिरम व्हॅली (2013) हल्ल्यासह अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी जबाबदार होता. सरकार व पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याने मुख्य प्रवाहात परतण्यास नकार दिला. पोलिसांच्या मते, या सलग कारवायांमुळे माओवादी तळांना मोठा धक्का बसला असून उरलेल्या कार्यकर्त्यांनी शस्त्र सोडून शांततेचा मार्ग स्वीकारावा, हा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.


