Vijay Kumbhar On Ashok Kharat: नाशिकचे बहुचर्चित अशोक खरात बलात्कार प्रकरण आता केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे पडसाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. प्रसिद्ध आरटीआय (RTI) कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणातील धक्कादायक आर्थिक आणि राजकीय लागेबांधे उघड केले आहेत. खरातचे जाळे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत असल्याचे कुंभार यांनी पुराव्यानिशी मांडले असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘मंत्रालय कनेक्शन’ आणि ३९ लाख लिटर पाण्याचा प्रस्ताव
विजय कुंभार यांनी अशोक खरातच्या ‘कुंडली’चा पंचनामा करताना गंभीर आरोप केले आहेत. खरातच्या ट्रस्टला सरकारकडून मोठी मेहरबानी दाखवली जात असून, तब्बल 39 लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. एका ‘भोंदू’ बाबाच्या संस्थेवर इतकी कृपा कुणामुळे केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरातचे राज्यातील आणि केंद्रातील बड्या मंत्र्यांसोबतचे फोटो पाहता, त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत कुणाचीही होत नव्हती, असेही कुंभार यांनी नमूद केले.
पोलीस अधिकारी आणि बदल्यांचे रॅकेट?
कुंभार यांनी प्रशासनातील अत्यंत धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, केवळ राजकीय नेतेच नव्हे तर चक्क पोलीस अधिकारी देखील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या ‘बाबा’चा सल्ला घेत होते. अनेक अधिकारी आपल्या बदल्या करून घेण्यासाठी राजकीय नेत्यांसोबत खरातच्या दरबारात जात असत, यावरून त्याची प्रशासनावरील पकड किती मजबूत होती हे स्पष्ट होते. खरातने आपल्या कुटुंबाच्या नावावर मोठी बेहिशोबी मालमत्ता जमा केली असून, त्याच्या आश्रमापर्यंत जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता सरकारी खर्चातून कुणी बांधला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रुपाली चाकणकरांवर थेट हल्ला आणि पदच्युतीची मागणी
विजय कुंभार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दडपशाहीचा थेट आरोप केला आहे. खरातविरोधात आवाज उठवणारे पत्रकार आणि तक्रारदारांना चाकणकर यांनी दमदाटी केल्याचा दावा त्यांनी केला. आयोगाच्या गोपनीय नोटिसी थेट आरोपीपर्यंत कशा पोहोचल्या, असा प्रश्न उपस्थित करत चाकणकर यांचे खरातशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे. “चाकणकर अजूनही त्या पदावर असणे हे महिलांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तत्काळ पदावरून हाकलून द्यावे,” अशी आग्रही मागणी कुंभार यांनी केली आहे.
दरम्यान, 100 हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला भ्रष्टाचार आणि राजकीय आशीर्वादाचा मोठा पदर असल्याचे आरटीआय कार्यकर्त्यांच्या दाव्यांमुळे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता येणाऱ्या काळात अनेक मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.


