उत्तर प्रदेश : मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकात बुधवारी संध्याकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. कालका-हावडा एक्सप्रेस ट्रेनने धडक दिल्याने ८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी आलेले श्रद्धाळू असल्याचे समजते.
घटनेदरम्यान भाविक गोमो-चोपेन पॅसेंजर ट्रेनने चुनार स्टेशनवर उतरले, मात्र चुकीच्या बाजूने उतरत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कालका-हावडा एक्सप्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की क्षणात सर्वत्र गोंधळ उडाला.
अपघातानंतर घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेले दिसले. काही प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. स्थानिक पोलिस, रेल्वे प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या भीषण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत.
रेल्वेने अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


