Dhananjay Munde : परळी येथे आयोजित ‘महापशुधन एक्स्पो’च्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मुंडे यांनी अजितदादांच्या शिस्तीचे आणि शेतीप्रेमाचे दाखले देत उपस्थितांची मने जिंकली. “आज जर अजितदादा आपल्यात असते, तर या भव्य पशुप्रदर्शनाचा आनंद त्यांना नक्कीच झाला असता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजितदादांच्या शेतीप्रेमाचे आणि कष्टाचे दाखले
कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले की, “अजितदादांचे शेतकऱ्यांवर आणि पशुधनावर अतोनात प्रेम होते. पहाटे उठून कामाला लागणाऱ्या दादांची कामाची पद्धत अद्वितीय होती. ते स्वतः जनावरांचे दूध काढून त्याची विक्री करायचे, ही त्यांची आठवण मी कधीच विसरू शकत नाही.” या आठवणींच्या माध्यमातून मुंडे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि त्यांचे पशुसंवर्धनातील योगदान अधोरेखित केले.
पंकजाताईंचे कौतुक आणि मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचा पाढा
धनंजय मुंडे यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्या भव्य आयोजनाचे जाहीर कौतुक केले. 1997 मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना अण्णांनी सुरू केलेली पशुप्रदर्शनाची परंपरा पंकजाताईंनी समर्थपणे पुढे नेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘कामधेनू’ची उपमा देत, परळी तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटींची तरतूद आणि केंद्राच्या ‘प्रसाद’ योजनेत प्रभू वैद्यनाथाचा समावेश करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
पशुसंवर्धनातून 24 लाख नवे उद्योजक घडवणार: पंकजा मुंडे
यावेळी पंकजा मुंडे यांनी विभागाच्या भविष्यातील योजनांचे सादरीकरण केले. पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. “या विभागाच्या माध्यमातून 24 लाख तरुणांना पशुपालनाद्वारे उद्योजक बनवण्याची आमची योजना असून, यातून ग्रामीण भागात मोठी आर्थिक क्रांती होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मला हे खाते मनापासून आवडले असून, यातून सामान्य शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळत आहे,” असेही त्या म्हणाल्या.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचे मिश्किल स्वागत
कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्या मिश्किल शैलीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. “देवेंद्रभाऊ महाशिवरात्रीऐवेजी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर परळीत आले आहेत, प्रभू वैद्यनाथ त्यांना उत्तम आरोग्य देवो,” असे ते म्हणाले. तसेच, परळी नगरपालिकेत महायुती म्हणूनच आम्ही जिंकलो आहोत, असे सांगत त्यांनी स्थानिक राजकारणातील एकीचे दर्शनही मुख्यमंत्र्यांना घडवले.


