Power Slap Championship 2025: भारतीय क्रीडा इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. पंजाबच्या रोपार जिल्ह्यातील चमकौर साहिबचा जुझार “टायगर” सिंग अबू धाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर स्लॅप चॅम्पियनशिपचा विजेता ठरला, आणि हा किताब जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत नेवाडा राज्य अॅथलेटिक कमिशनच्या अधिकृत मान्यतेसह जुझारने रशियाच्या प्रसिद्ध हेवीवेट खेळाडू अनातोली “द क्रॅकेन” गालुष्का याला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.
तीन फेरींची रोमांचक लढत
तीन फेरींच्या या झंझावाती सामन्यात गालुष्काने पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवले. परंतु दुसऱ्या फेरीपासून जुझारने आपला खेळ बदलला आणि निर्णायक तिसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन केले. शेवटी न्यायाधीशांनी एकमताने निर्णय जुझार सिंगच्या बाजूने दिला.
कोण आहे जुझार सिंग?
दरम्यान, २८ वर्षीय जुझार सिंग हा एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. शालेय काळात तो कुस्ती आणि कबड्डीचा उत्साही खेळाडू होता. नंतर त्याने मिश्र मार्शल आर्ट्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आपले कौशल्य विकसित केले. मोहालीतील एका प्रशिक्षण केंद्रात त्याने अत्यंत मर्यादित साधनांमध्ये कठोर सराव करून स्वतःला या पातळीवर आणले.
कठोर प्रशिक्षणाची फळे
पॉवर स्लॅप स्पर्धेत उतरायच्या एक वर्ष आधीपासून जुझारने तयारी सुरू केली होती. त्याच्या दैनंदिन दिनचर्येत पहाटे स्ट्रेंथ ट्रेनिंग, हात आणि मानेचे कंडिशनिंग व्यायाम, संतुलन आणि श्वास नियंत्रण तंत्र यांचा समावेश होता. जुझारने सांगितले, हा विजय फक्त माझा नाही. तो प्रत्येक भारतीय खेळाडूचा आहे जो छोट्या गावातून मोठी स्वप्ने पाहतो. मी सिद्ध करू इच्छितो की चमकौर साहिबचाही मुलगा जगाला चकित करू शकतो.


