Krishnaraj Mahadik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी अनोखा प्रतिसाद दिला आहे. आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या” दरम्यान महाडिक यांनी कोणत्याही व्हीआयपी लवाजम्यात न जाता, आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह थेट बार्शी ते सोलापूर असा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसने केला. त्यांच्या या साधेपणामुळे प्रवाशांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
भाषणापेक्षा कृतीवर
केवळ व्यासपीठावरून भाषणे ठोकण्यापेक्षा स्वतः कृती करून समाजात आदर्श निर्माण करण्यावर कृष्णराज महाडिक यांचा नेहमीच भर राहिला आहे. याआधीही त्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यासाठी प्रदूषणमुक्त ‘इलेक्ट्रिक’ वाहनाचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा मोठा संदेश दिला होता. आज थेट लालपरीने प्रवास करत त्यांनी जनसामान्यांशी असलेली आपली नाळ पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. राष्ट्रहितासाठी प्रत्येकाची जबाबदारी काय असावी, याचे जिवंत उदाहरण त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढीसमोर ठेवले आहे.
‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ
एका सामान्य नागरिकाप्रमाणे सार्वजनिक वाहनाचा पर्याय निवडत महाडिक यांनी इंधनाची बचत, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा प्रसार केला. त्यांच्या या कृतीमुळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असून, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेणे किती गरजेचे आहे, हाच संदेश या प्रवासातून देण्यात आला.
कार्यकर्त्यांना दिली जनजागृतीची मोठी जबाबदारी:
एस.टी. प्रवासादरम्यान सहकाऱ्यांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार हे निव्वळ शासकीय धोरण नसून, ती प्रत्येक सजग भारतीयाची जीवनशैली असायला हवी. आगामी काळात युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातील गावोगावी जाऊन ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
‘युवा शक्ती जागर’ दौऱ्याला मोठा प्रतिसाद:
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप युवा मोर्चाच्या वतीने “युवा शक्ती जागर दौरा” मोठ्या जोमाने सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत राज्यभरातील तरुणांशी थेट संवाद साधणे, पक्ष संघटनेची ताकद वाढवणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे काम केले जात आहे. कृष्णराज महाडिक यांच्या या जमिनीवरच्या आणि आक्रमक नेतृत्वाला सध्या महाराष्ट्रातील तरुण वर्गाकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड पाठिंबा मिळत आहे.


