बीड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत असताना, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून थेट सरकारला अल्टीमेटम दिला आहे. जरांगे यांनी स्पष्ट केले की, सरकारने दिवाळीपूर्वी मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांना ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे. शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये मदत तात्काळ द्यावी. हे निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
भरपाईची ठोस मागणी
जरांगे यांनी पुढे सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत त्यांना 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यावी. जनावरं, कांदा, सोयाबीन किंवा धान्य वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार शंभर टक्के मदत द्यावी, अशी ठाम मागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली.
पगारातून कपात करण्याचा प्रस्ताव
दरम्यान, उसाच्या दरातील कपातीला त्यांनी जोरदार विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून एक रुपयाही कापू नका. त्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून टप्प्याटप्प्याने कपात करून हजारो कोटी जमा होतील, असा पर्यायही जरांगे यांनी सुचवला.
हेही वाचा – Walmik Karad Poster: कराड आमचे दैवत…! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
कर्जमाफी आणि हमीभावाची मागणी
सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा आणि पिकविम्यातील अन्यायकारक तरतुदी काढून टाकाव्यात. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्याचीही मागणीही त्यांनी केली.
एक महिन्याचा अल्टीमेटम
शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. सरकारला यासाठी फक्त एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा देत जरांगे यांनी आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशाराही दिला


