Walmik Karad Poster: बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करतात. मात्र यंदाच्या मेळाव्यातील एका घटनेमुळे अनपेक्षित वाद निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषी ठरलेला आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर या मेळाव्यात झळकल्याचे समोर आले आहे. या पोस्टरवर ‘We support Walmik Anna, कराड आमचे दैवत’ असा मजकूर लिहिलेला होता. कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पोस्टमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंचीही तोफ धडाडणार? मोठी अपडेट समोर
अंजली दमानियांचा संताप
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘गुन्ह्यात दोषी ठरलेल्याचे बॅनर सार्वजनिक कार्यक्रमात झळकणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. अशा प्रसंगी आपण सर्वांनी शरमेने मान खाली घालणे आवश्यक आहे. पंकजा मुंडे यांना थेट विचारले पाहिजे की, त्यांची भूमिका नेमकी काय आहे. लोकांच्या मानसिकतेत विकृती आली आहे, इतक्या नीच स्तरावरचे राजकारण आता खुलेपणाने दिसत आहे. या विषयावर धनंजय मुंडेंना प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. परंतु, पंकजा मुंडेंनीच स्पष्ट भूमिका मांडावी.’
दसरा मेळाव्याचे औचित्य
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही त्यांनी सकाळी हेलिकॉप्टरने आगमन करत राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात दर्शन घेतले, पूजा-अर्चा केली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार लक्ष्मण हाके उपस्थित होते.


