नागपूरच्या वाठोडा परिसरातील बीडगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घराTragic Incident In Nagpur : त ठेवलेले तारपीन (टर्पेंटाइन) अनावधानाने प्यायल्यामुळे एका 2 वर्षांच्या निरागस बालकाचा मृत्यू झाला आहे. आई-वडिलांच्या क्षणिक दुर्लक्षामुळे घराचा दिवा विझल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्वविक शाम भदाडे (वय 2 वर्षे) असे या मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकी घटना काय? स्टोअर रूममधील बाटली पडली महाग
अद्वविकचे वडील केटरिंगचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराचे रंगकाम (पेंटिंग) झाले होते आणि उरलेली तारपीनची बाटली घरातील स्टोअर रूममध्ये तशीच ठेवून देण्यात आली होती. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अद्वविक खेळत असताना स्टोअर रूममध्ये गेला. तिथे असलेली बाटली पाहून त्याला तहान लागली असावी, पाणी समजून त्याने त्यातील विषारी तारपीन प्यायले. तारपीन पोटात जाताच अद्वविकची प्रकृती वेगाने बिघडली आणि तो अस्वस्थ होऊन रडू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.
उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी; मेडिकलमध्ये घेतला अखेरचा श्वास
चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने पारडी येथील भवानी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, परिस्थिती अधिक चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी अद्वविकला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. वाठोडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
पालकांनो सावध व्हा! ‘ही’ एक चूक आयुष्यातून उठवू शकते
या हृदयद्रावक घटनेने घरातील विषारी पदार्थांच्या साठवणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पालकांनी घरातील कीटकनाशके, अॅसिड, तारपीन किंवा फिनाईल यांसारखे पदार्थ मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा उंच ठिकाणी किंवा लॉक करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा रसायने पाणी किंवा कोल्ड्रिंकच्या बाटलीत भरून ठेवली जातात, जी मुले पेय समजून पिण्याची दाट शक्यता असते. एका छोट्याशा चुकीमुळे भदाडे कुटुंबाने आपला लाडका लेक गमावला असून, पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.


