MK Stalin Defeat: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आज भारतीय राजकारणातील सर्वात मोठा ‘उलटफेर’ नोंदवला आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि डीएमकेचे (DMK) सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन यांचा त्यांच्या हक्काच्या आणि अभेद्य मानल्या जाणाऱ्या ‘कोलाथूर’ मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तामिझगा वेट्री कझगम’ (TVK) पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच धूळ चारून तामिळनाडूच्या सत्तेची सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत.
‘चाणक्या’नेच मुख्यमंत्र्यांना हरवलं!
स्टॅलिन यांना त्यांच्याच घरात पराभूत करणारे व्ही.एस. बाबू हे एकेकाळी स्टॅलिन यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. २०११ मध्ये जेव्हा कोलाथूर मतदारसंघाची निर्मिती झाली, तेव्हा स्टॅलिन यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा बाबू यांनीच सांभाळली होती. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी बाबू यांनी अभिनेता विजय यांच्या पक्षात प्रवेश केला. जुन्या सहकाऱ्यानेच ‘कोलाथूर’च्या गडाचे कच्चे दुवे ओळखून स्टॅलिन यांचा सलग विजयाचा वारसा खंडित केला आहे.
१५ वर्षांचा अभेद्य गड भुईसपाट
कोलाथूर मतदारसंघ हा स्टॅलिन यांच्यासाठी ‘सेफ झोन’ मानला जायचा. २०११, २०१६ आणि २०२१ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये स्टॅलिन येथून मोठ्या फरकाने निवडून आले होते. अभिनेता विजय यांच्या ‘TVK’ पक्षाची राज्यात मोठी लाट दिसून आली. या लाटेत स्टॅलिन यांना आपली जागा वाचवता आली नाही. करुणानिधींच्या वारशाला मिळालेला हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
‘थलपती’ ठरले किंगमेकर; डीएमकेचे साम्राज्य धोक्यात
पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिन यांनी २०१८ मध्ये पक्षाची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री पदावर असताना स्वतःच्या मतदारसंघात झालेली ही हार डीएमकेसाठी केवळ जागा गमावणे नसून, नैतिक पराभवही मानला जात आहे. दुसरीकडे, पहिल्याच निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांच्या जागेवर विजय मिळवून थलपती विजय यांनी राज्याच्या राजकारणात ‘पॉवरफुल’ एन्ट्री केली आहे.


