Kantara Controversy : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या अतिउत्साहीपणामुळे आता कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. ‘कांतारा’ चित्रपटातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘भूत कोला’ परंपरेचा आणि हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपावरून बेंगळुरूमध्ये रणवीरविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देवतांना ‘भूत’ संबोधणे आणि अश्लील सादरीकरण करणे रणवीरला चांगलंच महागात पडण्याची चिन्हे आहेत.
नेमका वाद काय? ‘IFFI’ च्या मंचावर काय घडलं?
२८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोव्यात पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (IFFI) च्या समारोप समारंभात हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, रणवीरने ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीच्या उपस्थितीत तिथल्या संरक्षक देवतांचा उल्लेख चक्क “स्त्री भूत” (Female Ghost) असा केला. किनारी कर्नाटकातील श्रद्धास्थान असलेल्या पांजुर्ली आणि गुलिगा या दैवतांच्या हावभावांची रणवीरने अत्यंत अश्लील पद्धतीने नक्कल केली. यावेळी ऋषभ शेट्टीने त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र रणवीरने त्याकडे दुर्लक्ष करत आपला थिल्लरपणा सुरूच ठेवला.
न्यायालयाचे आदेश आणि गंभीर कलमे
बेंगळुरूचे वकील प्रशांत मेथल यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, बेंगळुरूच्या हाय ग्राउंड्स पोलिसांनी कलम १९६, २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कायदे धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याशी संबंधित आहेत.
भक्तांच्या भावना तीव्र; ८ एप्रिलला सुनावणी
तक्रारदारांच्या मते, “चावूंडी दैव” हे हजारो कुटुंबांचे आराध्य दैवत आहे. अशा पवित्र दैवताचा एका जागतिक व्यासपीठावर अपमान होणे हे भक्तांच्या जिव्हारी लागले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ एप्रिल रोजी होणार असून, पोलिसांकडून रणवीरला चौकशीची नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.


