Online Gaming Addiction: ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाचे गंभीर आणि भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. मेरठमधील दिल्ली गेट पोलीस स्टेशन परिसरात एका 23 वर्षीय तरुणाचा गेम खेळताना अचानक रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला. मोहम्मद कैफ (राहणार खैरनगर गुलर वाली) असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे प्राथमिक कारण मेंदूतील रक्तस्राव (Brain Hemorrhage) असल्याचे सांगितले जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कैफ हा तासन्तास मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्यात मग्न असायचा. घटनेच्या दिवशी तो कानात इअरफोन लावून गेम खेळत असताना त्याला अचानक तीव्र डोकेदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. काही वेळातच तो जागीच कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.
रक्तदाबाचा उच्चांक आणि डॉक्टरांचा इशारा
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कैफला रुग्णालयात आणले गेले, तेव्हा त्याचा रक्तदाब (Blood Pressure) 300 च्या वर पोहोचला होता, जो अत्यंत जीवघेणा मानला जातो. गेम खेळताना येणारा ताण आणि अतिउत्साहामुळे ही स्थिती ओढवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी गाझियाबादमध्येही तीन बहिणींनी गेमिंगच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
आरोग्य तज्ज्ञांचे आवाहन
या घटनेमुळे तरुणांमधील गेमिंगच्या व्यसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवणे, सततचा मानसिक ताण आणि खेळातील उत्तेजना यामुळे तरुणांच्या शरीरावर आणि मेंदूवर गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे आणि त्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष देणे आता काळाची गरज बनली आहे.


