Beed Crime: बीड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बिंदुसरा नदीत एका लहान मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाबा राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजता खासबाग-मोमिनपुरा लिंक रोड परिसरात काही स्थानिकांना नदीत एक वस्तू तरंगताना दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांना ती वस्तू लहान मुलीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. हा धक्कादायक प्रकार पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासानुसार, मृतदेह २ ते ३ दिवसांपूर्वी नदीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – मोठी बातमी..! सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक
पोलिसांनी डीएनए नमुने गोळा करून पुढील तपास सुरू केला आहे. मुलीची ओळख पटविण्यासाठी तसेच तिचा मृत्यू अपघाती होता की त्यामागे काही संशयास्पद कारण आहे, याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे बीड शहरात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.


