मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाने ठाणे महापालिकेत स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जोरदार मागणी केली आहे. काल आनंद आश्रम येथे झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर उमटल्याचे दिसले.
दुसरीकडे, भाजपनेही ठाणे महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या 18 प्रभागांमधील 416 इच्छुक उमेदवारांनी नुकतीच आयोजित कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ‘अबकी बार 70 पार’ आणि ‘महापौर भाजपचाच होणार’ असा नारा दिला, यावरून भाजपची महापौर पदासाठी तयारी दृढ असल्याचे स्पष्ट होते. कार्यशाळेत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा –ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
शिवसेनेच्या विकासकामांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना अडथळे येत असल्याची तक्रारही करण्यात आली. विशेष म्हणजे, शिंदे गट आणि भाजपमध्ये काही प्रमाणात कोल्ड वॉर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी या तणावावर शहरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाजपने 33 प्रभागातील इच्छुक उमेदवारांसाठी स्वतंत्र शिबीर आयोजित केले असून, उमेदवारांची चाचपणी देखील केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी महापौर पदासाठी भाजपची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती. ठाणे महापालिकेतील आगामी निवडणूक आता महायुतीत तसेच भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


