Konkan Hapus Mango: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या एपीएमसी (APMC) फळबाजारात कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूसचे आगमन झाले आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसची आवक प्रचंड घटली असून, केवळ १० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने यंदाचा पाडवा हापूसप्रेमींसाठी काहीसा महागडा ठरत आहे.
आवक घटली, चिंता वाढली
वाशी येथील घाऊक बाजारात दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर साधारणपणे एक लाख पेट्यांची विक्रमी आवक होते. मात्र, यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, यंदा नेहमीच्या तुलनेत केवळ १० टक्केच माल उपलब्ध झाला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे हापूसचे दर कडाडले असून, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
परंपरा आणि उत्साहाचे स्वागत
आवक कमी असली तरी व्यापाऱ्यांचा उत्साह मात्र कायम होता. पहाटे बाजार उघडताच आलेल्या हापूसच्या पेट्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली. पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात ‘फळांच्या राजा’चे स्वागत करण्यात आले. मुंबईतील बाजारपेठांमध्ये पाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांची वर्दळ असून, कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या हापूसची खरेदी करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
शेतकरी आणि व्यापारी संकटात
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील बागायतदारांना यंदा निसर्गाने दगा दिला आहे. मुहूर्तावर अपेक्षित माल न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे, बाजारात आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांच्या उलाढालीवरही याचा परिणाम झाला आहे. तरीही, पाडव्याचा सण गोड करण्यासाठी मुंबईकर हापूसच्या मोजक्या फळांकडे वळताना दिसत आहेत.


