Palghar Truck Accident: पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची कंटेनरशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी प्रवास करत होते. सुमारे २० ते २५ जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंगोली: ट्रॅक्टर कालव्यात कोसळून २० वर्षीय तरुणाचा अंत
दुसऱ्या एका घटनेत हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील फाटा गाव परिसरात एका तरुणाला शेताकडे जाताना मृत्यूने गाठले. ज्ञानेश्वर कदम (वय २०) हा तरुण पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन शेताकडे निघाला होता. अंधार आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कालव्यात कोसळले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.


