Praniti Shinde: महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी वेढलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकरणात आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. “खरातचे धाबे दणाणले असून अनेक बड्या व्यक्तींची नावे वाचवण्यासाठी त्याचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरातच्या मागे नेमका कोणचा वरदहस्त आहे, या चर्चेला उधाण आले आहे.
बंगल्याची झडती आणि आलिशान कार जप्त
एककीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना, दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ED) खरातवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल सकाळी 6 वाजेपासून खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्यावर ईडीने शोधमोहीम सुरू केली आहे. बेनामी संपत्तीच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने खरातची MH 15 GL 8181 या क्रमांकाची आलिशान मर्सिडीज कार जप्त केली आहे. सध्या विशेष तपास पथक (SIT) आणि ईडी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत असून, खरातच्या बेकायदेशीर मालमत्तेची संपूर्ण कुंडली काढली जात आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी केवळ खरात प्रकरणावरच नव्हे, तर केंद्र सरकारवरही जोरदार प्रहार केला. “भाजपच्या धोरणांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान धोक्यात आले असून, ते टिकवणे हीच खरी महापुरुषांना मानवंदना ठरेल,” असे त्या म्हणाल्या. तसेच, महिला आरक्षणावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “तीस महिन्यांनंतर सरकारला जाग आली असून हे विधेयक म्हणजे केवळ राजकीय स्टंट आहे, कारण महिलांना आरक्षण आधीच मिळालेले आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
बड्या नेत्यांचे धाबे दणाणले; गृहविभागासमोर मोठे आव्हान
अशोक खरातचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. खरातच्या संपर्कात असलेले ‘ते’ बडे चेहरे नेमके कोण आहेत आणि खरातने तोंड उघडल्यास कोणाचे पितळ उघडे पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर खरोखरच खरातच्या जीवाला धोका असेल किंवा त्याचा घातपात होण्याची शक्यता असेल, तर त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आता गृहविभागासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.


