Buldhana: इराण इस्त्रायल अमेरिका युद्धा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारत देशालाही याचा फटका बसला आहे. सध्या देशातील काही भागात गॅस टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझलेची देखील कमतरता असल्याचे चित्र आहे. त्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत एका व्यक्तीने पाण्याच्या खुल्या टाकीत भरले 200 लिटर डिझेल भरले होते. या प्रकरणी पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तहसीलदारांनी तक्रार दाखल केली
चिखली येथील पेट्रोल पंपावर पाण्याच्या खुल्या टाकीत 200 लिटर डिझेल विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली तहसीलदारांच्या तक्रारीवरून रेणुका पेट्रोलियम च्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. काल एबीपी माझाने वास्तव दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तहसीलदारांनी तक्रार दाखल केली आहे. BNS 223, 287 नुसार चिखली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जास्तीचे डीझेल देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंप चालकास जबर मारहाण
अफवांमुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर गर्दी होत असतानाच, जालना तालुक्यातील वानडगांव येथे एका पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एक हजार लिटर डिझेल देण्याची मागणी करत, पेट्रोल पंप चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे. पेट्रोल पंप चालकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल देण्यास नकार दिल्यामुळे ही मारहाण झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान हाणामारी
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. बिस्लेरीच्या बाटलीत पेट्रोल देण्यावरून ग्राहक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र हा वाद वाढत जाऊन दोन गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेत सुमारे 4 ते 5 जण सहभागी होते, तर 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


