Jitendra Awhad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तब्बल ३८ आमदारांनी भोंदूबाबा अशोक खरातकडे जाऊन आपल्या हाताची बोटं कापली आणि अघोरी पूजा केली, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आव्हाड यांनी या प्रकरणाचे अनेक धक्कादायक पदर उलगडले.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची घालवण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’चा घाट
आव्हाड यांनी थेट आरोप केला की, अशोक खरातने काही बड्या नेत्यांना शब्द दिला होता की, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री (फडणवीस) घरी गेलेले असतील.’ या अघोरी विद्येच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू होते. आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्याकडे अशा ३८ आमदारांची यादी आहे ज्यांनी खरातच्या दरबारात जाऊन आपल्या करंगळ्या कापल्या होत्या. परवा तर विधानभवनात आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते की, तू पण त्या बाबाकडे जाऊन आलास का?
२००७ पासूनचा गुन्हेगारी इतिहास आणि पोलिसांचे अभय
अशोक खरातला वाचवण्यासाठी २००७ मध्ये पत्रकार बाळू तुपे यांचा ‘बळी’ देण्यात आल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला. खरात कोण आहे हे पोलिसांना ठाऊक नव्हते असे नाही, पण अनेक बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला वाचवण्यासाठी मोठी लाच घेतली. या सगळ्या व्यवहाराची माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही आहे, असे आव्हाड यांनी ठामपणे मांडले.
सरकारी पैशातून भोंदूगिरीला खतपाणी?
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काळ्या जादूला ‘राज्यमान्यता’ मिळत असल्याबद्दल आव्हाडांनी संताप व्यक्त केला. ईशान्येश्वर मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून रस्ते, कमानी आणि टाक्या का बांधल्या गेल्या? शिक्षण खाते, म्हाडा आणि एसआरए मधील महत्त्वाच्या पोस्टिंग अशोक खरातच्या सांगण्यावरून केल्या जात होत्या का? खरातच्या ट्रस्टवर असलेल्या इतर सदस्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केले.
‘वेळ आल्यावर नावे उघड करणार’
या अघोरी प्रकारांची माहिती मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांपूर्वीच मिळाली होती. या आमदारांच्या आणि खरातच्या गुप्त बैठका झाल्या होत्या, असे सांगत आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी इशारा दिला की, योग्य वेळ येताच या कृत्यात सामील असलेल्या सर्व आमदारांची नावे जाहीर केली जातील.


