Anjali Damaniya on Ashok Kharat: मंत्र-तंत्राच्या सहाय्याने महिलांना संमोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कांड समोर येत आहेत. अशोक खरात हा व्हायग्रा टाकून एक जल बनवायचा आणि ते घेण्यासाठी राजकीय व्यक्तींची रांग लागायची असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. तसेच या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
व्हायग्रा टाकलेले ओशनो जल
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अशोक खरातवर आता अंजली दमानिया यांनी अजून एक आरोप केला आहे. अशोक खरात हा एक ओशनो जल बनवायचा. एका कफ सिरपमध्ये पाणी टाकायचा आणि त्यामध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा आणि हे ओशनो जल बनवायचा. हे ओशनो जल घेण्यासाठी अनेक राजकारणी त्यांच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यामध्ये एक व्यक्ती तर तिरुपती बालाजी मंदिराचा ट्रस्टी आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल
अनेक राजकारणी अशोक खरातचा सल्ला घ्यायचे आणि त्याच्याकडील ओशनो जलही मागवून घ्यायचे. त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. अशोक खरात याने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, याला महाराष्ट्रची एपस्टीन फाईल म्हणता येईल, असा टोला दमानिया यांनी लगावला.
आता आषाढी एकादशी झाली, ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही त्यांनी खरातचं दर्शन घ्यावं असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं होतं, असं सांगत अंजली दमानिया यांनी चाकणकरांचा एक जुना व्हिडीओ समोर आणला. या प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला जात नाही, त्यांना का वाचवलं जात आहे असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी केला.
चाकणकरांना राजीनामा देण्याचा आदेश
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात आरोप झाल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.


