Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या असून, सत्तेच्या या रणसंग्रामात महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवला असला, तरी या निवडीदरम्यान झालेल्या राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या उपस्थितीत धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपने पोलिसी बळाचा गैरवापर केल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे.
या निवडणुकीत संख्याबळाची जुळवाजुळव करताना मोठी पळापळ पाहायला मिळाली. मतदानाच्या ऐनवेळी शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शिवसेनेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ही लोकशाही मार्गानं झालेली निवडणूक आहे की सत्तेच्या जोरावर केलेली जबरदस्ती?” असा सवाल उपस्थित करत शिवसैनिकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्याला धक्काबुक्की होणे आणि सदस्यांना ताब्यात घेऊन मतदानावर प्रभाव टाकणे, हा प्रकार म्हणजे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा असल्याची भावना स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात महायुतीमधील दरी अधिक रुंदावण्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणुकीच्या निकालात भाजपच्या प्रिया शिंदे यांना ३३ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा फडतरे यांना ३२ मते पडली. अवघ्या एका मताने मिळालेल्या या विजयावर आता वादाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण रचनेत भाजप २७ जागांसह मोठा पक्ष होता, तर राष्ट्रवादी २० आणि शिंदे गटाकडे १५ जागा होत्या. मात्र, आजच्या राड्याने आणि मतदानाच्या प्रक्रियेत झालेल्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. साताऱ्यातील हा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा भविष्यात राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


