NCP Alliance : आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणाने पूर्णपणे कूस बदलली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याची चर्चा असतानाच, आता पुण्यातही अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२६ डिसेंबरला ‘फायनल’ निर्णय
खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना या युतीचे संकेत दिले आहेत. “कोण काय म्हणतंय यावर विश्वास ठेवू नका, अफवांकडे दुर्लक्ष करा. २६ डिसेंबर रोजी आम्ही अधिकृत घोषणा करू,” असे विधान अजित पवारांनी केले आहे. या संदर्भात ते उद्या मुंबईत वरिष्ठ नेत्यांसोबत अंतिम आढावा बैठक घेणार आहेत.
पुण्यात भाजपला रोखण्यासाठी नवी रणनीती
पुणे महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला असून, यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन्ही गटांच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडली. यामध्ये शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित होते.
हेही वाचा – uddhav Thackeray and Raj Thackeary: मनपासाठी ठाकरे सज्ज! युतीची उद्या घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित
पक्षात बंडाचे निशाण?
एकीकडे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र विरोधाचा सूर आवळला आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी पदाचा राजीनामा देईन,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या हालचालींना वेग दिला आहे.
मुंबईत ‘ठाकरे’ बंधूंची युती?
पुण्याआधी मुंबईत मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत. उद्या दुपारी १२:०० वाजता शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत ठाकरे आणि पुण्यात पवार एकत्र आल्यास महापालिका निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलणार आहे.


