रत्नागिरी: कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी नांदेड, लातूर, धाराशिव यांसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असला, तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी आहे. राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असला, तरी तुरळक भागातच पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून निर्माण होणारे मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस काहीसा विश्रांती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. १८ व १९ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.


