मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर लवकरच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सध्या महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर ८.३२ रुपये प्रति युनिट आहे. तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर आणला जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना फडणवीसांनी सांगितले की, राज्य सरकार वीज मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रणालीद्वारे खरेदी करणार आहे. यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दराने वीज खरेदी करता येईल. सौर आणि पवन ऊर्जा, तसेच बॅटरी स्टोरेजचा वाढता वापर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत आहे. परिणामी, वीजदरात स्थैर्य येणार असून पुढील २५ वर्षांसाठी दर स्थिर राहतील असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले की, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सर्वच स्तरांवरील वीज दरात कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक ग्राहक दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. या ग्राहकांना २६ टक्के दरसवलत मिळणार आहे.


