कुडाळ : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवास्थित फ्लाय ९१ विमानसेवेने सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सेवा आठवड्यातून दोनदाच उपलब्ध होती. वाढलेली वारंवारता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील प्रवास अधिक सुलभ करणार असून, या भागातील पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक संपर्क वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे.
सध्या फ्लाय९१ ही विमानसेवा कमी सुविधा असलेल्या भागांना इतर शहरांशी सहजपणे जोडण्यावर भर देत असून, या माध्यमातून प्रादेशिक विकासाला चालना देण्याचे कार्य करत आहे. विमानसेवेची वारंवारता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायांना नव्या संधी मिळण्याची आणि आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग-पुणे विमान वाहतूक सुरूही झाली आहे. गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती.
ही सेवा पुन्हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी खासदार राणे आग्रही. होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्त्वाची आहे, याशिवाय विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवासुविधा अपडेट करण्यात येत आहेत. अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबईदरम्यान उड्डाणे सुरू केली. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गसाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गसाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी भूमिका खासदार राणे यांनी स्पष्ट केली होती. सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून पाच वेळा सुरू होत असल्याने राणेंच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे


