Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांची पोस्ट
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय
दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य
या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.
महाराष्ट्राच्या विकासाठी प्रयत्नशील राहीन
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.


