नांदेड : नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर तिकीट वाटपात ५०-५० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे.
“चव्हाणांनी कार्यकर्त्यांचा बळी घेतला, दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन मला तिकीट नाकारले,” असा थेट हल्ला रावतांनी चढवला. यामुळे नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भानुसिंह रावत हे १९८० पासून चव्हाण कुटुंबीयांशी एकनिष्ठ होते. अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर त्यांनीही पक्षात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १६ मधून त्यांनी तिकीट मागितले होते आणि चव्हाणांनी शब्दही दिला होता. मात्र, तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिल्याने रावत नाराज झाले. ते म्हणाले, “भाजपने एकूण ६६ उमेदवार दिले, त्यातील फक्त १८ खरे भाजप कार्यकर्ते आहेत. उर्वरित पैसे देऊन आलेले. हिरवा भाजप कोण करतोय हे जनतेला माहिती झाले आहे. देव त्यांना बघून घेईल.”
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ते म्हणाले, “उमेदवारीसाठी कोणाकडूनही पैसे मागितले नाहीत. माझी राजकीय कारकीर्द ५० वर्षांची आहे. असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे.” चव्हाणांनी रावतांच्या आरोपांना खोडसाळपणाचे म्हटले आहे.
नांदेड महापालिकेत एकूण जागा असून, भाजपने मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. मात्र, हे प्रकरण पक्षाच्या अंतर्गत नाराजीला उघड करणारे ठरले आहे. १५ जानेवारीला मतदान असून, या आरोपांमुळे भाजपच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


