Ashok Kharat Case : राज्यात गाजत असलेल्या भोंदू बाबा प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT कडे बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणांसमोर नवीन प्रश्न उभे राहिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने थेट SIT कडे जाऊन ही तक्रार नोंदवली आहे. मात्र या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि हा प्रकार राजकीय हेतूने करण्यात आला आहे का, याची सखोल चौकशी आता केली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात पीडितांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे. आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषण तसेच कौटुंबिक वादांशी संबंधित अनेक तक्रारी दररोज नोंदवल्या जात असल्याने SIT समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चौकशीदरम्यान अशोक खरात याने “मी इथून बाहेर पडणार नाही” अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे दाखल असून, फसवणूक आणि लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


