छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाच्या कार्यक्रमात ‘तू मला धक्का का दिला’ असा जाब विचारल्यावरून राजकीय नेत्यांची मुले आपसात भिडली. यामध्ये एका गटाच्या तरुणाने चाकूहल्ला केल्याने त्यात जि.प.चे माजी सभापती किशोर बलांडे यांचा मुलगा विवेक (२०, रा. सुदर्शननगर, एन-११, हडको) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा राडा बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एन-११, साठे चौकात झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २०) सिडको ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विवेक बलांडे, शिवराज रमेश इधाटे व कृष्णा रमेश इधाटे हे बालपणापासून मित्र आहेत. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ते विष्णू मेघावाले (स्वामी विवेकानंदनगर, एन-१२) याचा वाढदिवस असल्याने त्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी गेले. याच कार्यक्रमात प्रतिक बोंबले हा देखील आला होता. कृष्णा इधाटे याला प्रतिक बोंबले याने धक्का दिला. कृष्णाने याचा जाब विचारताच प्रतिकसह त्याच्या मित्रांनी शिवीगाळ केली. त्यानंतर हा वाद मिटला. तेथून विवेक, कृष्णा आणि शिवराज हे तिघे घराकडे निघाले. त्यांना प्रतिक बोंबले, उमेश सुरे, रोहित म्हस्के, कार्तीक सुरे, सागर सुरे यांच्यासह १० ते १२ जणांनी गाठले आणि बेदम मारहाण केली. विवेकवर चाकूहल्ला केला. यात तो जखमी झाला.
फायटर, लाकडी दांड्याने मारहाण
प्रतिक प्रभाकर बोंबले याच्या फिर्यादीनुसार वाढदिवसाच्या कार्यक्रमात कृष्णा ईधाटेला धक्का लागल्यावर त्याने शिवीगाळ केली. हा वाद मिटल्यावर प्रतिक घराकडे निघाला, आरोपी शिवराज रमेश ईधाटे, कृष्णाराज रमेश ईधाटे, विवेक किशोर बलांडे, आदित्य पवार या आरोपी तरुणांनी प्रतिकला गाठले. त्याला फायटर, लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी प्रतिकच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत.


