Shivraj Patil News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (चाकूरकर) यांचे आज सकाळी लातूर येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून वाढत्या वयामुळे ते आजारी होते आणि घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवराज पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबियांचे अत्यंत जवळचे विश्वासू मानले जायचे. सोनिया गांधी यांचे ते विशेष निकटवर्तीय होते. त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपद, केंद्रीय गृहमंत्रीपद तसेच इतर अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले होते. तसेच पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लातूर ग्रामीण मतदारसंघातून झाली. १९७३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९८० मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि सलग सात वेळा लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांच्याकडे देशाचे गृहमंत्रालय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.


