Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय ३०) यांचा मृतदेह शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी हदियाबाद-नारवाडी रस्त्यावरील नळकांडी पुलाजवळ आढळला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या टेमकर यांच्या अचानक मृत्यूने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, पोलिसांकडून घातपाताची शक्यता तपासली जात आहे.
नेमकं काय घडलं?
गंगापूर तालुक्यातील नारवाडी शिवारात शुक्रवारी सकाळी हा संशयास्पद मृतदेह दिसल्याची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना कळवले. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, विजय पाखरे आणि अनिरुद्ध शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला. टेमकर हे भालगाव गावचे रहिवासी होते आणि गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची नोंद पोलिसांकडे आधीच होती.
अपघात की घातपात?
प्राथमिक तपासात मृतदेहावर मारहाण किंवा शस्त्राने हल्ल्याचे कोणतेही स्पष्ट चिन्हे आढळली नाहीत. तसेच, वाहन अपघाताचे पुरावेही घटनास्थळी सापडले नाहीत. यामुळे, अपघात की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टेमकर यांचा मृतदेह पुलाजवळील झाडाच्या खाली आढळला असून, त्यांच्या कपड्यांची अवस्था आणि आसपासचे पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तपास युद्धपातळीवर सुरू आहे.


