हिंगोली : गणपती सणानिमित्त गावाकडे निघालेल्या एका शिक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाचा गेल्या 40 तासांपासून थांगपत्ता लागत नसल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांची पत्नी आणि दोन मुलं अशा चौघांचा मोबाईल बंद असून, नातेवाइकांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या रहस्यमय बेपत्ता प्रकरणाने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावाकडे निघालेलं कुटुंब गायब
हिंगोली जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलंही गुहागर येथे राहतात. गणपती सण साजरा करण्यासाठी हे कुटुंब कारने आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे निघालं होतं. मात्र, ते गावी पोहोचलेच नाहीत. नातेवाइकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला, परंतु गेल्या 40 तासांपासून त्यांचे मोबाईल बंद आहेत. यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत नातेवाइकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.
नातेवाइकांचे शोधकार्य, पोलिसही सतर्क
कुटुंबाचा संपर्क तुटल्यापासून नातेवाइकांनी स्वतःहून शोधाशोध सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे स्थानिक पोलिसही सतर्क झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाने प्रवासासाठी वापरलेल्या मार्गाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी काही पथकं तयार केली आहेत. कुटुंबाच्या गाडीचा माग काढण्यासाठी आणि त्यांच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
परिसरात चिंतेचं वातावरण
या कुटुंबाच्या बेपत्ता होण्यामागील कारणांचा तपास अद्याप सुरू आहे. अपघात, अपहरण किंवा अन्य कोणती परिस्थिती यामागे आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. गणपती सणाच्या उत्साहात निघालेल्या या कुटुंबाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने हिंगोलीतील नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. नातेवाइकांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.


