छत्रपती संभाजीनगर : भाजपकडून मराठवाडा भागात स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू असल्याची खबर समोर आली आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय बैठकीची आतली माहिती समोर आली आहे.
या बैठकीत महायुतीत राहून लढणे की स्वतंत्रपणे उतरणे, यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाशी थोडे-फार जुळवजुळव शक्य असले तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको, ही मागणी जोर धरली. विधानसभेत राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने दिलेल्या त्रासाचा पाढा पदाधिकाऱ्यांनी वाचला असून, स्वबळावर लढण्याची भूमिका अनेकांनी मांडली.
बैठकीची आतली बातमी समोर
भाजपाची ही बैठक मध्यरात्रीपर्यंत चालू होती. यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती आणि स्वबळावर सविस्तर चर्चा झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. एकवेळ शिवसेना शिंदे गटाशी जुळवजुळव शक्य असली तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती टाळावी, ही एकमत झाली.
काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढल्यास पक्षाची पकड मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर स्थानिक पातळीवर युती केल्यास काही जागांवर फायदा होऊ शकतो, ही भूमिकाही मांडली गेली. बैठकीनंतर फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेऊन स्थानिक ताकदीचा आढावा घेण्याचे संकेत दिले. मराठवाड्यात भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादीशी युती नको ही पदाधिकाऱ्यांची मागणी
बैठकीत मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर जोरदार चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत दिलेल्या अडचणी आणि शिंदे सेनेने केलेल्या त्रासाचा उल्लेख करत पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. मात्र, शिंदे गटाशी भावनिक नाते असल्याने थोडे-फार जुळवजुळव शक्य आहे, अशी भावना व्यक्त झाली. सरकारच्या सकारात्मक वातावरणाबाबत विचारले असता, पदाधिकाऱ्यांनी होकार दिला. फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय पदाधिकाऱ्यांनाच सोपवण्याचे सुचवले.
स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज राहा
फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ नोव्हेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता असून, त्यासाठी तयारी करा, असे ते म्हणाले. निवडणुका महायुतीत लढवल्या जातील, पण स्थानिक पातळीवर निर्णय कार्यकर्ते घेतील. “प्रत्येक ठिकाणी स्थानिक ताकद आणि जनसमर्थन लक्षात घेऊन उमेदवार निवडले जातील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात टप्प्याटप्प्याने प्रथम नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.


