मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हप्ता वेळेवर जमा होईल की नाही, याबाबत शंका होती; परंतु सामाजिक न्याय विभागाने ४१० कोटींचा निधी वर्ग करत शुक्रवारपासून (११ ऑक्टोबर) हप्ता वितरणाला सुरुवात केली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत १ कोटी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे. मात्र, योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक असून, दरवर्षी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसीसाठी फक्त अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc वापरावे, कारण https://hubcomuat.in/ सारख्या बनावट वेबसाइट्समुळे डेटा चोरीचा धोका आहे.
केवायसीतील अडचणी
केवायसी प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. वेबसाइट ठप्प होणे, ओटीपी न येणे, तसेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक असल्याने ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना अडचणी येत आहेत. यावर सरकार काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
1. https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जा आणि e-KYC बॅनरवर क्लिक करा.
2. आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून OTP साठी संमती द्या.
3. प्राप्त OTP टाकून Submit करा.
4. जर केवायसी आधीच पूर्ण असेल, तर “e-KYC पूर्ण झाली” असा संदेश दिसेल.
5. नसल्यास, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून OTP मागवा.
6. OTP टाकून जात प्रवर्ग निवडा आणि खालील घोषणा प्रमाणित करा:
– कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेणारे नाही.
– कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
7. चेकबॉक्स निवडून Submit केल्यावर “e-KYC यशस्वी” असा संदेश दिसेल.


