Thackeray Manifesto 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे १५ दिवस शिल्लक असताना, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईच्या कायापालटाचा सविस्तर आराखडा मांडला आहे. शिवसेना भवनात पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उमेदवारांसमोर एक विशेष प्रेझेंटेशन सादर केले. हा आराखडा आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, त्यानंतर महायुतीला टक्कर देण्यासाठी अधिकृत ‘वचननामा’ प्रसिद्ध केला जाईल.
ठाकरे बंधूंच्या वचननाम्यातील १० मोठी आश्वासने:
१. हक्काचे घर आणि स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण: मुंबई महापालिकेची जमीन बिल्डरांना न देता, तिथे पालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, पोलीस आणि गिरणी कामगारांसाठी घरे बांधली जातील. पुढील ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरे देण्याचे आश्वासन असून पालिकेचे स्वतःचे ‘गृहनिर्माण प्राधिकरण’ स्थापन केले जाईल.
२. बेस्टचा ‘फ्लॅट रेट’ आणि १० हजार बसेस: बेस्ट प्रवासाचे दर ५, १०, १५ आणि २० रुपये असे निश्चित केले जातील. ताफ्यात १० हजार इलेक्ट्रिक बसेस आणि ९०० डबल-डेकर बसेसचा समावेश असेल. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवास पूर्णतः मोफत असेल.
३. १०० युनिट वीज मोफत: बेस्टच्या वीज ग्राहकांना दरमहा १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. तसेच उपनगरांमध्येही बेस्टच्या विद्युत सेवेचा विस्तार केला जाणार आहे.
४. आरोग्य क्रांती आणि स्वतःचे कॅन्सर रुग्णालय: मुंबईत ५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जातील. पालिकेचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय, जेनेरिक औषधांची उपलब्धता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हेल्थ टू होम’ सेवा २४ तास कार्यरत असेल.
५. शिक्षण आणि ‘बोलतो मराठी’ उपक्रम: महापालिका शाळा आता फक्त १० वी पर्यंत मर्यादित न ठेवता तिथे १२ वी पर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू केले जाईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व शाळांमध्ये ‘बोलतो मराठी’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येईल.
६. महिलांसाठी ‘स्वाभिमान’ आणि मासाहेब किचन्स: घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये ‘स्वाभिमान निधी’ दिला जाईल. तसेच कष्टकऱ्यांसाठी अवघ्या १० रुपयांत पोटभर नाश्ता आणि जेवण देणारी ‘मासाहेब किचन्स’ सुरू केली जातील.
७. स्वयंरोजगार आणि गिग वर्कर्सना मदत: ‘बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार योजने’ अंतर्गत १ लाख तरुणांना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा मदत निधी दिला जाईल. डबेवाले आणि २५ हजार गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
८. मोफत पार्किंग आणि सुरक्षित फूटपाथ: पालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग मोफत असेल. पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक घराला पार्किंगची हमी दिली जाईल. फूटपाथ ‘पेव्हर ब्लॉक मुक्त’ करून ते दिव्यांगांसाठी सुलभ केले जातील.
९. पर्यावरण आणि रेसकोर्सचे संरक्षण: महालक्ष्मी रेसकोर्स, आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जागा कोणत्याही बिल्डरच्या घशात जाऊ दिली जाणार नाही. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ‘मुंबई पर्यावरण कृती आराखडा’ कठोरपणे राबवला जाईल.
१०. पाणी हक्क आणि डिसॅलिनेशन: टॉवर असो वा झोपडपट्टी, प्रत्येकाला पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळणार. पाण्याचा तुटवडा रोखण्यासाठी डिसॅलिनेशन (समुद्राचे पाणी गोड करणे) प्रकल्प आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला जाईल.


