Rahul Narvekar Controversy: मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात आता दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातून एक मोठी ठिणगी पडली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विरोधी उमेदवारांना धमकावले आणि त्यांचे अर्ज भरण्यापासून रोखले, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नेमका वाद काय? ‘कुटुंब’ निवडणुकीच्या रिंगणात
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ मधून राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत: १. मकरंद नार्वेकर (भाऊ) २. गौरवी शिवलकर (बहीण) ३. हर्षदा नार्वेकर (वहिनी). हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानुसार, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांनी स्वतः उपस्थित राहून प्रशासनावर दबाव आणला. पोलिसांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावून त्यांना अर्ज दाखल करण्यापासून रोखले गेले, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
७० सरकारी अधिकारी प्रचारात? काँग्रेसचे गंभीर आक्षेप
पत्रात पुढे असे म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी आणि कर्मचारी हे सरकारी सेवेत असतानाही नार्वेकर कुटुंबाच्या निवडणूक प्रचारात सक्रिय आहेत. शासकीय यंत्रणेचा हा वापर म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन असून, या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे दडपशाही करणे म्हणजे लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने आपला पाठीचा कणा मजबूत असल्याचे दाखवून देत राहुल नार्वेकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्यावर आणि तेही विधानसभा अध्यक्षांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


