Nagpur Politics: महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या माघारीच्या दिवशी नागपुरात अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रभाग १३ (ड) मधील भाजपचे उमेदवार किसन गावंडे यांनी माघार घेऊ नये, यासाठी संतप्त समर्थकांनी त्यांना चक्क राहत्या घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पक्षशिस्त पाळण्याची गावंडे यांची विनंती आणि ‘लढाच’ असा हट्ट धरणारे कार्यकर्ते यांच्यातील या हायव्होल्टेज ड्राम्याने नागपूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
नेमका वाद काय?
प्रभाग १३ (ड) मधून भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांनाही ‘एबी फॉर्म’ (AB Form) दिले होते. मात्र, ऐन शेवटच्या क्षणी पक्षाने गावंडे यांना माघार घेण्याचे आदेश दिले. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे गावंडे यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी गावंडे यांना अर्ज मागे घेण्यासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.
कार्यकर्त्यांचे प्रेम मोठे, पण पक्षशिस्त महत्त्वाची
घरातूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना किसन गावंडे भावूक झाले. समर्थकांच्या प्रेमामुळे त्यांचे डोळे पाणावले होते, मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो, पण मला पक्षाचा आदेश पाळावाच लागेल. मी कार्यकर्त्यांना हात जोडून आणि पाया पडून विनंती करतो की, मला पक्षशिस्त पाळू द्या, असं गावंडे म्हणाले. असे असले तरी, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. आम्ही तुम्हाला आज घराबाहेर पडू देणार नाही आणि तुम्ही माघार घ्यायची नाही, असा पवित्रा घेत समर्थकांनी गावंडे यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे.
भाजपची ‘मानधरणी’ यशस्वी ठरणार का?
दुसरीकडे, भाजपकडूनही गावंडे आणि त्यांच्या समर्थकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकाच जागेवर दोन एबी फॉर्म दिल्याने निर्माण झालेला हा तांत्रिक आणि राजकीय पेच आता गावंडे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरत आहे. एकीकडे पक्षश्रेष्ठींचा आदेश आणि दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दबाव, अशा दुहेरी कात्रीत गावंडे अडकले आहेत. आज अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने, शेवटच्या काही तासांत किसन गावंडे कार्यकर्त्यांना शांत करून अर्ज मागे घेतात की समर्थकांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून मैदानात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


