Mumbai News : मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. विक्रोळीतील टागोरनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या भीषण घटनेत एका ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला स्पीकर अचानक तिच्या अंगावर पडला आणि ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी टागोरनगरमधील आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला दोन मोठे स्पीकर स्टँडवर उभे करण्यात आले होते. परिसरात आनंदाचं वातावरण होतं आणि रस्त्यावर लहान मुले खेळत होती.
याचवेळी घराबाहेर खेळत असलेली ३ वर्षांची चिमुकली पळत असताना अचानक तिच्या अंगावर तो स्पीकर कोसळला. स्पीकर पडताच ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
स्थानिक नागरिकांनी चिंधीवाला व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे स्पीकर कोसळल्याचा आरोप केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती स्पीकरजवळ जाताना दिसतो. त्यावेळी स्पीकरच्या स्टँडला किंवा वायरला धक्का लागतो आणि स्पीकर थेट खाली पडतो. त्याच क्षणी त्या ठिकाणाहून चिमुकली पळत जात असते आणि दुर्दैवाने स्पीकर तिच्या अंगावर पडतो.
घटनेनंतर मुलीच्या काकांच्या मुलाने तिला तातडीने उचलून रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


