पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी (Tarapur MIDC) येथील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड (Medley Pharmaceuticals Limited) कंपनीत (प्लॉट नंबर एफ-13) आज (21 ऑगस्ट) दुपारी 2:30 ते 3:00 वाजण्याच्या सुमारास नायट्रोजन रिएक्शन टँकमधून झालेल्या वायुगळतीमुळे भीषण दुर्घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील शिंदे खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना मेडली फार्मासिटिकल्स कंपनीत एल बेंडोझोल नावाच्या औषधाच्या उत्पादनादरम्यान घडली. दुपारी 2:30 ते 3:00 वाजण्याच्या सुमारास नायट्रोजन रिएक्शन टँकमधून गॅस गळती झाली, ज्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या आठ कामगारांना विषबाधा झाली. या कामगारांना तातडीने शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु चार जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर रोहन शिंदे, निलेश हाडळ यांच्यासह दोन अन्य कामगार जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बोईसर पोलीस आणि पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु नायट्रोजन गॅसच्या गळतीमुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर तपासाची चक्रे फिरवली असून, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेतला जात आहे.


