BJP candidate office attacked in Ambernath : अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीपाडा परिसरात मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी भाजपच्या प्रभाग क्रमांक ४ (क) च्या उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कार्यालयाच्या दिशेने सुमारे ४ राऊंड फायरिंग केले. या घटनेत कार्यालयातील सुरक्षारक्षक जखमी झाला असून, सुदैवाने अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे सर्व दृश्य कार्यालयाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (१७ डिसेंबर) अंबरनाथ दौऱ्यावर येत असून, भाजपच्या प्रचारासाठी त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेआधीच भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस, डीसीपी, एसीपी आणि जॉइंट सीपी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला असल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिस कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने तपास करत आहेत.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही घटना घडल्याने शहरात तणाव वाढला आहे. पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन करत आहे.


